Tuesday, July 26, 2011

श्रावणी सोमवारची कहाणी - शिवामुठीची


आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्टं, नेसायला जाडंभरडं. राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास आला. पहिला सोमवार आला. ही रानीं गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, "बाई बाई, कुठं जातां?" " महादेवाच्या देवळीं जातों, शिवामूठ वाहतों." "यानं काय होतं?" "भ्रताराची भक्ति होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलंबाळं होतात. नावडतीं माणसं आवडतीं होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ति होते." मग त्यानीं हिला विचारलं, "तूं कोणाची कोण?" "म राजाची सून, तुमच्याबरोबर यीं." त्यांचेबरोबर देवळांत गेली.

नागकन्या-देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, "काय ग बायांनो वसा वसतां?" " आम्ही शिवामुठीचा वसा वसतों." "त्या वशाला काय करावं?" "मूठ चिमुट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्याई, गंध फूल घ्यावं, दोन बेलाचीं पानं घ्यावीं. मनोभावं पूजा कराई. हाटीं तांदूळ घ्यावए आणि तोंडानं "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा." असं म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टंमाष्टं खाऊं नये. दिवसा निजूं नये. उपास नाहीं निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळीं आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पांच वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चवथ्यास जव आणि पांचवा आला तर सातू शिवामूठीकरितां घेत जावे.

पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या-देवकन्यांनीं दिलं, आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला संगितलं. त्या दिवशीं हिनं मनोभावं पूजा केली. सारा दिवस उपास केला. जावानणंदांनीं उष्टंमाष्टं पान दिलं. तें तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरांतून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानांत जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावें पूजा केली आणि "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडती आहें ती आवडती कर रे देवा." असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली.

संध्याकाळीं सासऱ्यानं विचारलं. "तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, "माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, कांटेकुटे आहेत. साप-वाघ आहेत, तिथं माझा देव आहे." पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊं लागली. घरचीं माणसं मागं चाललीं. "नावडते, तुझा देव दाखव," म्हणून म्हणूं लागलीं. नावडतीला रोजचा सराव होता. तिला कांहीं वाटलं नाहीं. ह्यांना कांटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानांत कशी येत असेल कोण जाणे.

नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्यांसहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, हांड्या गलासं लागलीं. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनीं देवाचं दर्शन घेतलं. नावडाती पूजा करूं लागली. गंधफूल वाहूम लागली. नंतर मूग घेऊन "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहें ती आवडती कर रे देवा." असं म्हणून शिवाला वाहिलें. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळीं माणसं बाहेर आलीं.

इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळीं राहिलं देवळाकडे आणायला गेला. तों तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हां त्यांने सुनेला विचारलं, " हें असं कसं झालं?" "माझा गरिबाचा हाच देव. मीं देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हांला दर्शन दिलं." सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखींत घालून घरीं आणलं. नावडती होती ती आवडती झाली

जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी. पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

श्रावणी सोमवारची कहाणी - साधी

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याचा एक शिष्य होता. तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेंत वेळूचं बेट होतं. परत येऊं लागला, म्हणजे "मी येऊं? मी येऊं?" असा ध्वनि उठे. हा मागं पाही, तों तिथं कोणी नाहीं. त्या भीतीनं वाळूं लागला. तेव्हां गुरुजींनीं विचारलं, "खायला प्यायला वाण नाहीं. मग बाबा, असा रोड कां?" "खायला प्यायला वाण नाहीं हाल नाहीं, अपेष्टा नाहीं. स्नान करून येतेवेळेस मला कोणी ‘मी येऊं? मी येऊं? असं म्हणतं. मागं पाहतों तों कोणी नाहीं. ह्याची मला भिती वाटतें." गुरुजी म्हणाले, "भिऊं नको, मागं कांहीं पाहूं नको. खुशाल त्याला ये म्हण, तुझ्यामागून येऊं दे.

मग शिष्यानं काय केलं. रोजच्याप्रमाणं स्नानास गेला. पूजा करून येऊं लागला. "मी येऊं?" असा ध्वनि झाला. "ये ये" असा जवाब दिला. मागं कांहीं पाहिलं नाहीं. चालत्या पावलीं घरीं आला. गुरुजींनीं पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं.

त्यानंतर काय झालं. श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणूं लागला, "माझी वाट पाहू नको, उपाशी राहूम नको." आपण उठला. शंकराचे पूजेला गेला. तिनं थोडी वाट पाहिली. सैंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला. इतक्यामधें पति आला. "अग अग, दार उघड." पुढचं ताट पलंगाखालीं ढकलून दिलं. हात धुतला. दार उघडलं. पति घरांत आले. नित्य नेम करूं लागले. पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशींही असंच झालं. असं चारी सोमवारीं झालं.

सरता सोमवार आला. रात्रीं नवल झालं. दोघंजणं पलंगावर गेलीं. पलंगाखालीं उजेड दिसला. "हा उजेड कशाचा?" "ताटी भरल्या रत्नांचा." "हीं रत्नें कुठून आणली?" मनांत भिऊन गेली. "माझ्या माहेरच्यांनीं दिलीं." " तुझं माहेर कुठं आहे?" "वेळूच्या बेटीं आहे." "मला तिथं घेऊन चल." पतीसह चालली. मनीं शंकराची प्रार्थना केली. "मला अर्धघटकेचं माहेर दे." तों वेळूचं बेट आलं. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणि म्हणे नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटकी राबताहेत. शिपाई पाहारा करताहेत. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवणं झालीं. सासूसासऱ्यांचीं आज्ञा घेतली. घरीं परतलीं.

अर्ध्या वाटेत आठवण झाली, खुंटीवर हार राहिला. तेव्हां उभयतां परत गेलीं. घर नाहीं, दार नाहीं. शिपाई नाहींत, प्यादे नाहींत, दासी नाहींत. बटकी नाहींत. एक वेळूचं बेट आहे. तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यांत घातला. नवऱ्यांनं विचारलं, "इथलं घर काय झालं?" "जसं आलं तसं गेलं. अभाय असेल तर सांगतें. चाई सोमवारीं हांक ऐकली. जेवतीं ताटं ढकलून दिलीं. रत्नानीं भरलीं. सोन्याची झालीं. तीं मल देवांनीं दिलीं. आपण विचारूं लागला तेव्हां भिऊन गेलें. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनीं तुमची खात्री केलीं. माझी इच्छा परिपूर्ण झाली

जसा त्यांना शंकर पावला, तसा तुम्हां आम्हां पावो ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

Thursday, July 14, 2011

गुरूपोर्णिमा

गुरूपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...

Wednesday, July 6, 2011

असावा सुंदर चोकॉलेटचा बंगला

असावा सुंदर चोकॉलेटचा बंगला,
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला 

चोकॉलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार,
शेपटीच्या झुपक्यान झडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन,
हॅलो हॅलो करायला छोटासा फोन

बिस्किटांच्या गच्चीवर मोर शानदार, 
पेपरमिंटच्या अंगणात फुले लाल लाल 

चांदीच्या झाडामागे चांदोबा रहातो
छोट्याश्या फुलाशी लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला,
मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चोकॉलेटचा बंगला, 
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

Tuesday, July 5, 2011

देव माझा विठु सावळा..

देव माझा विठू सावळा..
देव माझा विठू सावळा..

माळ त्याची माझी या गळा
देव माझा विठू सावळा ||

विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी
भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा ||

साजिरे रूप सुंदर, कटी झळके हे पितांबर
कंठात तुळशीचा हार कस्तुरी टिळा ||

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रंगून जाई भक्तांचा पाहुनी लळा ||