Tuesday, December 27, 2011

केतकीच्या वनी तिथे

केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर
गहिवरला मेघ नभी सोडला गं घीर ||

पापणीत साचले अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
ओठावरी भिजला गं आसावला सूर ||

भावपुर्ण रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले
डोळियात पाहिले रे कौमुदीत नाचले
स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरात थांबले
झाडावरी दिसला गं भारला चकोर ||

गायिका: सुमन कल्याणपुर
संगीतकार: अशोक पत्की
गीतकार: अशोक परांजपे

आम्ही कोण?


आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया -
सौंदर्यातीशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!

शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनीया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!

- केशवसुत

वेडात मराठे वीर दौडले सात

म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात निमिषात

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी
गदीर्त लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा
ओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वार्यावर गात

निश्चयाचा महामेरु

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा

आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी

धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले

देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा.

Monday, December 5, 2011

चंद्र आहे साक्षीला

पान जागे फुल जागे, भाव नयनी जागला
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला

चांदण्याचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रीला
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला

स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो
सूर हा, ताल, हा, जीव वेडा डोलतो
रातराणीच्या फुलांनी, देह माझा चुंबिला

लाजरा, बावरा, हा मुख चंद्रमा
अंग का चोरिसी, दो जीवांच्या संगमा
आज प्रीतीने सुखाचा, मार्ग माझा शिंपिला

संगीत - सुधीर फडके
गायक - आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट - चंद्र आहे साक्षीला (१९७८)

मी डोलकर


मी डोलकर, डोलकर, डोलकर दयार्चा राजा
घर पान्यावरी, बंदराला करतो ये जा

आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पिवली गो, नेसलय अंजिरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा
वास परमाळता वार्‍यान घेतय झोका
नथ नाकान साजिरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलीवार्‍याची मी गो रानी
रात पुनवेला, नाचून करतय मौजा

या गो, दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगर लाटा
कवा उदानवारा शिराला येतय फारु
कवा पान्यातूनी आभाला भिरतंय तारु
वाट बगून झुरते पिरती
मंग दर्याला येते भरती
जाते पान्यान भिजून धराती
येते भेटाया तसाच भरतार माजा

भल्या सकालला आभाल झुकतंय हे खाली
सोनं चमचमतंय दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी रापण टाकतो जाळी
धन दर्याचं लुटून भरातो डाली
रात पुनवेचं चांदन प्याली
कशी चांदीची मासोली झाली
माज्या जाल्यात होऊन आली
नेतो बाजारा भरुन म्हावरा ताजा

गीतकार - शांता शेळके
गायक - लता - हेमंत कुमार
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय..


गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
माझ्या पिरतीची रानी तू होशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय !
तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय !

ग तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं
माझं कालिज भोलं, त्याच मासोली झालं
माझ्या प्रीतीचा, सुटलाय तुफान वारा वारा वारा
रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरा
तुझ्या नजरंच्या जादूला, अशी मी भुलणार नाय

रं माझ्या रूपाचा ऐना, तुझ्या जीवाची दैना
मी रे रानाची मैना, तुझा शिकारी बाणा
खुळा पारधी ग, जाळ्यामंदी आला आला आला
ग तुला रुप्याची नथ मी घालीन
ग तुला मिरवत मिरवत नेईन
तुज्या फसव्या या जाल्याला, अशी मी गावनार नाय

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार ......हाय !
तुझ्या पिरतिचि रानी मी होनार हाय !

गीत - सुधीर मोघे,
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक - आशा भोसले
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा (१९७६)